Saturday, 18 March 2017

भाव तरंग-मनाच्या अनाकलनीय चेष्टा

भावतरंग-मनाच्या अनाकलनीय चेष्टा झिमझिम पाऊस पडतोय.रस्ते ओलेचिंब आहेत.बाहेर जायची इच्छा असूनही बाहेर जाता येत नाही.हवेत गारठा आहे.झोंबरे वारे वाहाताहेत. समोरच्या बंगल्याच्या कौलावर एक कबूतर पंख मिटून बसलंय.सगळीकडे शुकशुकाट.रोजची कामे धीमे गतीने होताहेत.तीन तांबे पाणी अंगावर टाकून स्नान झालं. मनात मात्र रिक्तता आहे प्रकृतीशी मनाचं समायोजन. क्वचितच होतं.प्रकृती- त .होणारं परिवर्तन कधीकधी मनाने अस्पर्शितंच राहातं.मनाची आपली चाल असते.सभोवतालचं जग आपापल्या उलथापालथीत निमग्न असतं तर मनात मात्र भगभग असते. बाहेर स्तब्धता आत मात्र भावभावनांचा उसळता डोंब. माणसाचे भाव सारखे बदलते असतात.त्यात स्थैर्य नसतं.मन ताब्यात राहू इच्छित नाही. स्वतःचंस्वतःचं स्वातंत्र्य ते अबाधित ठेवतं.त्याचं आपलं अस्तित्व इतर सर्वांवर मात करतं. मनाचा रेख लक्षात येत नाही .वाटतं तिथं शांतता आहे.स्तब्धता आहे.तर दुसऱ्या क्षणीतिथं वादळ उठलेलं असतं.उद्विग्नताअसते .कारण काहीही नसतं. मनाच्या अनाकलनीय चेष्टा. मनाची हमशाही. स्वतःची ही विक्षिप्तता,हे वेडेपण माणूस इतरां पासून लपवित असतो.आतली भगभग,उसळत्या लाटा त्याने दाबून ठेवलेल्या असतात.आेठावर हंसू अंतरात आसू अशी विचित्र अवस्था असते. मन आनंदी असायला हवं.वास्तविक आनंद त्याचं मूळ रूप पण नेमका त्याचाच त्याला विसर पडतो.

No comments:

Post a Comment