आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच स्वतःच्या अंतरंगाचं अलिप्ततेनं निरीक्षण करणं होय.
अंतरंगाचे रंग स्वतःलाच कळतात.आतल्या ऊर्मी स्वतःलाच जाणवतात.बहिर्वर्तनात वेगळं दिसू शकतं.निरीक्षणातून जे जाणवतं ते सत्य असतं. त्यापासून पलायन करता येत नाही.
आसक्ती वाढतच जाते.तिला अंत नाही.आसक्तीतून अपेक्षा,अभिलाषा,आकांक्षा,
मोह इत्यादींचा जन्म होतो.
माणूस मात्र आसक्त नसल्याचा आव आणतो .तो खोटा असतो.
अंतर्मनाचा शोध ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो.परंतु माणूस ते टाळतो.त्यातून
स्वतःला अभिप्रेत नसलेलं स्वतःचं रूप डोळ्यासमोर येण्याचा येण्याचा संभव असतो.तिकडे
लक्ष जाऊ नये म्हणून इतर गोष्टीत स्वतःला गुंतवून घ्यावे लागते.
कुणी वाचनात मग्न तर कुणी लेखनात,कुणी मनोरंजनात तर कुणी व्यसनात,
कुणी नाच गाण्यात तर कुणी नाटक तमाशात,स्वतःला विसरायची हाव.
ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे ज्याने त्याने स्वतः ठरवलेल्या मार्गाने वाटचाल होते.
कुणी दारु पिऊन स्वतःची स्वतःला होणारी बोच विसरू पाहातो तर कुणी वेश्येच्या पायी वा
तिच्या मिठीत लोळण घेतो.कुणी देव भक्तीत दंग होतो तर कुणी खेळ, क्रीडेत रममाण होतो.
खरं स्वरूप आवडेनासं होतं.लोकांच्या नजरेत चांगलं दिसावं म्हणून प्रतिष्ठित
असल्याचं सोंग घेणं हेच त्याच्या हातात असतं
एकुण स्वत्व दाहक असतं.
Wednesday, 10 May 2017
भावतरंग- स्वत्व दाहक असतं
Monday, 8 May 2017
भाव तरंग-कळतं पण वळत मात्र नाही.
सुख दुःख क्षणिक असतं.दोन्हीही मनाच्या धारणाअसतात.जी घटना आपल्याला सुखदायक वाटते ती दुसऱ्याला नेमकी दुःख दायक वाटते.त्यामुळे सुखाविषयी प्रत्येका-
च्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात.
सुख दुःखाचा संबंध मनोकल्पित असतो.आज सुखदायक असलेली घटना नेहमीच
सुखकारक असेल असे नसते.माणसाचे कौटुंबिक संबंध,त्याच्या इच्छा,आकांक्षा,इतरांकडू-
न अपेक्षा,सांपत्तिक स्थिती,शारीरिक स्वास्थ्य,महत्वाकांक्षा या साऱ्या साऱ्यांचा संबंध
कृतीशी येतो व कृतीचं फलित सुख वा दुःखदायक असतं.कृती ही बाह्य वा आंतरिक
व्यवस्थेवर अवलंबून असते.ठरवलं तसं क्वचितच घडतं व अपेक्षेप्रमाणे यश अपयश मिळतं.
यश मिळताच मन उल्हसित होतं.आनंदित होतं.अपयश येताच निराश व दुःखी होतं.
अर्थात ही अवस्था परिवर्तनीय असते.पण मन मात्र खंत करीत बसतं दुःखात खंत व सुखात
ही अवस्था अशीच टिकून राहील वा नाही या विषयी चिंता.दोन्हीही गोष्टी अहितकारक.
सुख दुःखात मनाचा तोल जाता कामा नये.तिथं समता असायला हवी. ती अलिप्त-
तेतूनच प्राप्त होऊ शकते.
घडणाऱ्या घटनांकडे त्रयस्थ दृष्टीने पाहाता यायला हवं.फक्त कृती कशी केव्हां कितीवेळ करायची एवढंच आपल्या हातात असतं.कृतीचं फलित आपल्या नियंत्रणात नसतं.
सुख असो वा दुःख दोघांकडे ईश्वरी प्रसाद म्हणून पाहाणारा माणूसच आनंदित
राहू शकतो.कृतीचं फलित आपल्या अपेक्षेप्रमाणेच असायला हवं हा अट्टाहास चुकीचा असतो.
कळतं सगळ्यांना पण वळत मात्र नाही हीच खरी शोकांतिका असते.